पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात पुण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला आहे.
पुण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी आले होते. या कार्यक्रमाला पुण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे व बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून शहर प्रमुख नाना भानगिरे उपस्थित होते.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.
दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांसमोर तुफान घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली.पोलिसांनी मध्यस्थी केली असून गोंधळ रोखण्याचे काम सुरू आहे. आणि काही वेळातच पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संपूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मैदानात उतरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत.