मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हरहर महादेव चित्रपटावरून चित्रपटगृहात गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
चित्रपटगृहात एका तरुणाला मारहाण झाली होती. शिवाय शो देखील बंद करण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद झाला होता. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल ट्वीट करत माहिती दिली की, मला पोलिसांनी सांगितले की, तुम्हाला अटक करावे लागेल. चित्रपटातून संपूर्ण मराठा समाजाचा अपमान केला गेला आहे. शिवाजी महाराजांना बदनाम करण्यात येत आहे. त्याला विरोध करण्यासाठी कारागृहात जावे लागत असेल तर मी सहज जाईल. जामिनासाठी देखील अर्ज करणार नाही, असेही आव्हाड म्हणाले.
आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 11, 2022
हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडणे, जमावबंदी नियम तोडणे, प्रेक्षकांना मारहाण करणे, अशा विविध कारणांवरून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. वर्तकनगर पोलिसात गुन्हा कलम १४१ ,१४३ ,१४६ , १४९ ,३२३ , ५०४ , मुंबई पोलीस कायदा कलम ३७ /१३५ आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.