Breaking News : मुंबई : खातेवाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपावर एकमत होऊ शकले नाही. दोन खात्यांवरून तिढा निर्माण झाला असून, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप लांबणीवर पडले आहे. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. बच्चू कडू देखील नाराज असल्याची माहिती आहे.
खातेवाटपावरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा
दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. दहा दिवस झाले तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप झालेले नाही. बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरावे लागत असल्याने या मंत्र्यांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. खातेवाटपावरून अजित पवार नाराज असल्याचे चर्चा आहे. (Breaking News) अर्थखातं आपल्याकडे राहावं, यासाठी ते आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. तर शिंदे गटाचे नेते याच खात्यासाठी अडून बसले आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी इच्छुक आहे, तर शिंदे गट देखील याच पदासाठी अडून बसला आहे. त्यामुळे अजित पवार यांची नाराजी पाहायला मिळत आहे.
आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक होणार आहे. काल अमित शहांशी भेट झाल्यानंतर अजित पवार साधणार संवाद आहेत. बैठकीत काय चर्चा झाली, यावर अजित पवार वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. अजित पवार यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘देवगिरी’ बंगल्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. (Breaking News) खातेवाटपात कोणतीही अडचण येणार नाही. कालच्या दिल्लीत अमित शहांसोबतच्या बैठकीत मार्ग निघाला असावा, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळेल, असं शिंदे सरकार स्थापन झाल्यापासूनच बोललं जात आहे. पण आता होणाऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. (Breaking News) अशातच आता बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे