मुंबई : शिंदे आणि भाजप सरकार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त उद्या मंगळवारी मिळाला आहे. यामुळे उद्या अकरा वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तर विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. सध्याच्या राजकीय घड़ामोड़ीमुळे काही नावांचा फेरविचार होऊ शकतो. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असावा अशी दोघांची इच्छा आहे. तर संजय शिरसाठ आणि अब्दुल सत्तार यांचे नाव कापले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
महाराष्ट्रात आगामी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात पॅटर्न अवलंब करायचा आहे. पण गुजरात पॅटर्ननुसार सर्वच नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर राज्य कारभार करण्यास पुढे अडचणी येऊ शकतील. त्यामुळे काही नवे चहरे आणि काही जुने चेहरे यांच्यातील समन्वय साधून विस्तार करण्यात यावा, अशी फडणवीसांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांसकडून मिळाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात भाजप पॅटर्न जर अवलंबला गेला तर राज्यातील अनेक भाजपच्या बड्या नेत्यांना धक्का बसू शकतो. पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय त्याबाबत झाला असेल तर तो निर्णय त्यांच्यासाठी अनिवार्य राहील.