मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ऋतुजा लटके विक्रमी मतांनी विजयी मिळविला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६५ हजारांहून अधिक मते मिळाली आहेत.
आमदार ऋतुजा लटके यांचे दिवंगत पती रमेश लटकेंपेक्षा जास्त मते मिळवून ऋतुजा यांनी विजय मिळविला आहे.
अठराव्या फेरीतील मतमोजणीत ऋतुजा लटके ६६२४७, बाला नाडार यांना १५०६, मनोज नायक यांना ८८८, नीना खेडेकर यांना १५११, फरहाना सय्यद यांना १०८७, मिलिंद कांबळे यांना ६१४, राजेश त्रिपाठी यांना १५६९ आणि नोटा १२७७ मते पडली आहेत. अशी एकूण एकूण ८६१९८ पडली आहेत.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली मनपा शाळेमध्ये आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना आमदार ऋतुजा लटके म्हणाल्या, “पहिलं माझं हेच असणार आहे की, रमेश लटके यांची जी कामे अर्धवट राहिली आहेत, ती कामे पूर्ण करण्यास माझी प्राथमिकता असणार आहे. याशिवाय त्यांचा जो अंधेरीचा जास्तीत जास्त विकासाचा ध्यास होता, त्यानुसार काम करणार आहे. मी सर्व जनतेचे आभार मानते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात याशिवाय या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी घेणारे अनिल परब या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.”