Madhuri Dixit : मुंबई : लोकसभा निवडणुकीची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. उमेदवार देखील मतदारसंघावर दावा करत आहेत. यातच आता बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने देखील निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब आजमावणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ती रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
आपला अभिनय आणि सौंदर्याने माधुरीने अनेकांच्या मनावर राज्य केले. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज माधुरी सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता माधुरी दीक्षित निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपातर्फे माधुरीला तिकीट दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, नेमक्या कोणत्या मतदारसंघातून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. २३ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थळी झालेल्या चर्चेत माधुरीला लोकसभा निवडणुकीचे तिकिट देण्याच्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर माधुरी भाजपच्या तिकिटावर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पुनम महाजन यांच्या मतदारसंघातून माधुरी दीक्षित यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. भाजपाने मतदारसंघामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपाने नवीन प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे. भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सध्या मुंबईतील तीन मतदार संघ हे भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामधील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिला तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी पुण्यातील जागेसंदर्भातही माधुरीची चर्चा सुरु होती. सध्या खासदार गजानन किर्तिकर आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यामध्ये जोरदार वाद सुरु आहे. त्यावर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले असून, त्यांना यश मिळाले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार अमोल किर्तिकर यांच्याविरोधात ही जागा भाजपला मिळाल्यास तेथून माधुरीला तिकिट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जून महिन्यात ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानाअंतर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट देखील घेतली होती.