पुणे : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक (वय-५७) यांचे गुरुवारी (ता. २२) दुपारी निधन झाले आहे.
पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज गुरुवारी त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या काही महिन्यांपासून मुक्ता टिळक या कर्करोगाशी झूंज देत होत्या. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आहेत. अर्थात बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून आहेत.
मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार होत्या. मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले आहे. त्या भाजपच्या पहिल्या महापौर आहेत. मुक्ता टिळक या टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत.
लोकमान्यांचा लढवय्या बाणा जपणाऱ्या मुक्ता टिळकांची अशी होती राजकीय कारकिर्द..!
शिक्षणपुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकली होती. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी. शिवाय, मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचं शिक्षण. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केलं होते.
आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक १५ च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यानंतर २०१७ साली त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या.
महापौर असतानाच २०१९ साली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या. मुक्ता टिळक यांचे पतीही भाजपमध्ये सक्रिय आहेत. मुक्ता टिळक या गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जायच्या.
भाजप नेत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट..!
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या भाजपच्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी दुपारच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.
पक्षनिष्ठ आणि लढवय्या..!
विधान परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मग अशावेळी भाजप पक्ष मागे कसा राहणार? पक्षाने दिलेले आदेश पाळणे, हे आमच्या रक्तामध्येच भिनलं आहे. त्यामुळे मी आज पक्षाच्या मतदानासाठी जात आहे, अशी प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांनी मतदानापूर्वी दिली होती.