दीपक खिलारे
इंदापूर : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजच्या दिवसाची आठवण ठेवून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाची वाटचाल करावी, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले. गुरुवारी (ता. १२) शिवभक्त परिवार व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.
यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव बाजी मोहिते तसेच शिवभक्त परिवाराचे डॉ. लक्ष्मण आसबे आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या जननी आहेत. त्यांनी मुलावर संस्कार कसे करायचे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कसे धैर्याने पुढे कसे जायचे हे शिकविले. त्या एक महान कार्य कर्तृत्ववान व्यक्ती होत्या. तसेच स्वामी विवेकानंदांनी युवा पिढीला आपल्या कार्य कर्तृत्वात दक्ष राहण्याची शिकवण दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीचे पूजन करुन करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव बाजी मोहिते तसेच शिवभक्त परिवाराचे डॉ. लक्ष्मण आसबे उपस्थित होते.
डॉ. लक्ष्मण आसबे यांनी राजमाता जिजाऊंच्या कार्याचे अनेक दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना दिलेले संस्कार तसेच स्वराज्य स्थापनेची प्रेरणा व मार्गदर्शन संबंधी माहिती डॉ. आसबे यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितली.
यावेळी सर्व आजी – माजी सैनिक, एसआरपीएफ, सीआरपीएफ यांच्या माता किंवा पत्नी यांचे जिजाऊ पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथील अमर शहीद लक्ष्मण संतू डोईफोडे यांच्या वीरपत्नी श्रीमती सुवर्णाताई लक्ष्मण डोईफोडे यांना या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच श्री.नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूरचा माजी खेळाडू अक्षय बाळासाहेब मोरे याची दुबई येथे होणाऱ्या बेसबॉल युनायटेड लीगसाठी निवड झाल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रकाश खांबसवाडकर यांनी मानले.