पुणे : गेल्या महिन्यापासून राज्यभरात गाजत असलेल्या कसबा पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना ११ हजार ४० मतांनी पराभूत केले आहे. यामुळे गेल्या ३० वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये प्रथमच महाविकास आघाडीने मुसंडी मारल्याचे चित्र आहे.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने या दोन मुख्य उमेदवार आमनेसामने आले होते. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेचे करण्यात आली होती. या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी दोन्हीकडील मोठे नेते मैदानात उतरले होते.
आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून प्रत्येक फेरीत रवींद्र धंगेकर यांना मिळणारा प्रतिसाद वाढत होता. प्रत्येक फेरीत धंगेकर यांचे मताधिक्य वाढत होते. चौथ्या व पाचव्या फेरीत रसाने यांनी धंगेकर यांचे मताधिक्य कमी केले होते. मात्र त्यानंतर सातव्या फेरीनंतर धंगेकर यांनी पुन्हा एकदा मतांची मुसंडी मारताना विजय आटोक्यात आणला.
२० व्या फेरीच्या वेळी धंगेकर यांनी सुमारे साडे नऊ हजारांचे माताधिक्य घेतले होते. २० व्या फेरीअखेर ११ हजार ४० मते घेऊन धंगेकर विजयी झाले.
कार्यकर्ता झाला आमदार..!!
तीन निवडणुकांपासून कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर हे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. सामान्यांचा कार्यकर्ता ही त्यांची ओळख असल्याने सामान्य माणूस देखील हक्काने त्यांच्याशी जोडला गेला होता. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर नाहीतर सातत्याने सामान्य लोकांमध्ये धंगेकर यांची उठबस असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांशी ते जोडले गेलेले होते. लोकांमध्ये मिसळून राहण्याच्या प्रवृत्तीमुळेच ही निवडणूक धंगेकर विरुद्ध भाजप अशी झाली, असे अनेक सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सामान्य कार्यकर्ताच आता आमदार झाला आहे, अशी प्रतिक्रिया कसबा मतदारसंघातील अनेक मतदात्यांनी दिली आहे.
पराभवाची जबाबदारी माझीच ; हेमंत रासने
मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही कमी पडलो, त्यामुळेच पराभव झाला. हा पराभव आम्ही मान्य केला असून, या पराभावाचे चिंतन आम्ही निश्चितच करू, अशी प्रतिक्रिया अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रसाने यांनी दिली.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप विजयाच्या उंबरठ्यावर
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मागे सोडून भाजपाच्या अश्विनी जगताप विजयाच्या समीप पोचल्या आहेत. दोन्ही उमेदवारांमध्ये सुमारे १० हजार मतांपेक्षा जास्त मतांचे अंतर आहे. ही आघाडी शेवटच्या काही फेऱ्यात मोडून काढणे अवघड आहे. त्यामुळे अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित आहे.
बिचुकलेना अवघे ४७ मते
बिग बॉसमधून राज्यातील घराघरात पोचलेले अभिजित बिचुकले यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरून खळबळ निर्माण केली होती. आक्रमकपणे सर्वच राजकीय पक्षांवर टीका करून त्यांनी सनसनाटी निर्माण केली होती. मात्र, कसब्यातील मतदारांनी अभिजित बिचुकले यांना स्पष्ट नाकार दिला. या निवडणुकीत अभिजित बिचुकले यांना केवळ ४७ मते मिळाली आहेत. मोठमोठे दावे करणारे बिचुकले यांना मतांची पन्नाशी देखील गाठता आली नाही.
भाजपाचा पराभव आमच्यामुळे झाला यांची खंत निश्चित आहे, मात्र याचा प्रश्चाताप नाही. कसबा, सदाशिव, नारायण येथील मतदारांनी यावेळेस भाजपाच्या विरोधात मतदान केले आहे. मागील निवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना सुमारे २०,००० चे मताधिक्य मिळाले होते, येथेच मात्र भाजपच्या उमेदवाराला सुमारे १४०० मतांनी मागे पडले. भाजपचे बेडगी हिदुत्व, आर्थिक आरक्षण नाकारणे व पारंपरिक मतदारांना गृहीत धरणे यामुळे भाजपाला पराभव सहन करावा लागला आहे. :
आनंद दवे, उमेदवार, कसबा पोटनिवडणूक २०२३