मुंबई : मुंबै बँकेच्या १२३ कोटींच्या कथित घोटाळ्यातून गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपात्रातून प्रवीण दरेकर यांच्या नाव वगळण्यात आल्याने भाजपाला मोठा दिलासा मिळाला आहे. ठोस पुराव्यांअभावी दरेकर यांच्याबरोबरीने इतर संचालकांची देखील नावे या प्रकरणातून वगळण्यात आली आहेत.
प्रवीण दरेकर हे सन २००० पासून मुंबै बँकेचे संचालक असून २०१० पासून ते अध्यक्ष देखील आहेत. सन २०१५ मध्ये मुंबै बँकेच्या मुंबईतील ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामूनगर आणि अंधेरी शाखामधून बनावट कर्ज घेतल्याची माहिती उघड झाली होती.
या घोटाळा प्रकरणात विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर, शिवाजी नलावडे व राजा नलावडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले होते.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपासाला सुरुवात केली. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात १० मजूर संस्थांना आरोपी करण्यात आले असून दरेकर व इतर संचालकांचा सहभाग असल्याचा पुरावा नसल्याचे म्हटले आहे. हे आरोपपात्र सादर केले असून यावर न्यायालयाने मोहोर लावली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.