पुणे : अखेर कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ बैठकीत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या गटनेतापदावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच विधिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. यामुळे आता फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार हे निश्चित झाले आहे. फडणवीस उद्या (दि. ५) संध्याकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. अशातच शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच एक बातमी समोर आली आहे. दिल्ली मध्ये झालेल्या बैठकीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. मात्र भाजपने त्यांची मागणी फेटाळून लावली.
याबाबत माहिती अशी की, 28 नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेतृत्वाची भेट घेतली होती. या बैठकीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा उपस्थित होते.
टाईम्स ऑफ इंडियाने भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्वासमोर सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. संपूर्ण कार्यकाळासाठी मुख्यमंत्रीपद देणे शक्य नसेल तर पहिले सहा महिने द्यावे, असे शिंदे म्हणाले होते.
भाजपचे उत्तर काय?
शिंदे यांचा प्रस्ताव भाजप नेतृत्वाने चर्चेदरम्यानच फेटाळून लावला होता. यामुळे चुकीचे उदाहरण समोर येईल, असे भाजपकडून सांगण्यात आले. हा चुकीचा निर्णय असून त्याचा प्रशासनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. भाजप नेतृत्वाने सांगितले की, सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री नेमण्याची व्यवस्था करता येणार नाही. तशी व्यवस्थाच नाही.
भाजपचे उत्तर ऐकून शिंदे अवाक..
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिंदे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या कथित आश्वासनाची आठवण करून दिली. ज्यामध्ये बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री राहतील, असे म्हटले होते. मात्र भाजपने पक्षाला जवळपास बहुमत मिळाल्याचे सांगितले. अशा स्थितीत मुख्यमंत्रीपद देणे चुकीचे होईल.
भाजपच्या नेत्याने सांगितले की, भाजप नेतृत्व म्हणाले की, जर तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले असते तर तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडले असते का? भाजपचे हे उत्तर ऐकून एकनाथ शिंदे अवाकच होऊन गेले.
सभेनंतर शिंदेंनी गाठले गाव..
दिल्लीमध्ये भाजप नेतृत्वासोबत बैठक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी गेले होते. तेव्हा शिवसेना नेत्यांकडून त्यांच्या प्रकृतीचे कारण सांगण्यात आले होते. तेथून परतल्यानंतर त्यांनी ठाणे गाठले. ठाण्यातील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर शिंदे मंगळवारी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. येथे त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचीही सुमारे अर्धा तास भेट घेतली. अशी माहिती समोर येत आहे.