पुणे : नाशिक पदवीधर मतदार संघातील पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्याच्या घडीला काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या नाशिक मतदारसंघातील पराभवामुळे काँग्रेसचे नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांच्यात वाकयुद्ध सुरु होते. मात्र त्याचा परिणाम म्हणून बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला असल्याचे सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. मात्र हा राजीनामा काँग्रेस हायकमांडने स्वीकारला नसल्याची देखील माहिती मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कोणताही संपर्क झालेला नाही. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. मात्र, काँग्रेस हायकमांडचे पक्षातील गटबाजीवर लक्ष आहे., असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सावध भूमिका घेतली आहे.
विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा हा थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडकडे सोपवला जातो. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याविषयी आम्हाला तरी अद्याप काहीही माहिती नाही, असे म्हणत पक्ष प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हात वर केले आहेत.