पुणे : लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये विनोद तावडे यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशात सहप्रभारीपदाची आहे तीच जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे.
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही यात संधी मिळाली आहे. त्यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. तर विजया रहाटकर यांना राजस्थान सहप्रभारी करण्यात आले आहे. याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एक यादी जाहीर केली आहे.
भाजपने राज्यांसाठी नवीन नियुक्ती केलेल्या प्रभारींमध्ये लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. बिप्लब कुमार दुबे यांना हरियाणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर राधामोहन अग्रवाल यांना केरळचे सहप्रभारी बनवण्यात आले आहे. मुरलीधर राव यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशात पंकजा मुंडे आणि डॉ. रमाशंकर कथेरिया यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने विभिन्न राज्यों के प्रभारी एवं सह-प्रभारी को नियुक्त किया है। pic.twitter.com/Rn4uyB8cmL
— BJP (@BJP4India) September 9, 2022
आमदार विजय रुपानी यांना पंजाबचे प्रभारी तर डॉ. नरेंद्र सिंह रैना यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.दादरा आणि नगर हवेली आणि दम आणि दीवचे प्रभारी खासदार विनाडे सोनकर यांना करण्यात आले आहे. खासदार राधामोहन अग्रवाल यांची लक्षद्वीपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरुण चुघ यांना तेलंगणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर अरविंद मेनन यांची तेलंगणाचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण सिंह यांना राजस्थानचे प्रभारी खासदार केले आहे. राजस्थानमध्ये विजया रहाटकर सह प्रभारी असतील. खासदार महेश शर्मा यांना त्रिपुराचे प्रभारी बनवण्यात आले आहे.
पंकजा मुंडेंकडे पुन्हा तेच पद…!
राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती. मात्र, पंकजा मुंडे यांना राज्यापासून दूर ठेवत केंद्रीय राजकारणात ठेवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न दिसतो आहे. 2020 साली भाजपाने पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिव अशी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशाची सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा मध्य प्रदेशात सहप्रभारी अशी जबाबदारी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी दक्षिणेतील मुरलीधर राव यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर सहप्रभारीपदी पंकजा मुंडे यांच्यासोबत डॉ. राम शंकर कठेरीया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पंकजा यांच्याकडे गेल्या वेळी दिलेलीच जबाबदारी ठेवण्यात आलेली आहे.