मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानं राज्याच्या विविध भागात संतापाची लाट उसळली. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध केला. त्यातच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर गेले आहेत. असे असताना लाठीचार्ज करणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत राज्य सरकारने मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केलं. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण कसं देणार याकडेही लक्ष वेधले आहे.
सराटी येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी सायंकाळी हिंसक वळण लागले. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. तेव्हापासून पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यानंतर गृह विभागाने कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. दरम्यान, आम्ही कोणतीही दगडफेक केलेली नाही. आम्हाला मारहाण करणारे सगळेच पोलीस बडतर्फ पाहिजे आणि आमच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. एक ओळीचा आरक्षणाचा जीआर काढा आणि विषयाला पूर्णविराम द्या, असे आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केले.
मराठा समाजाला आरक्षण द्यायचं कसं? मुख्यमंत्र्यांनी सांगूनच टाकलं
मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, आम्ही आरक्षण देतोय हे दाखवण्यासाठी आम्ही काही करत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, लाठीचार्जची घटना दुर्दैवी आहे. आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तसेच मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? हे मी आत्ता सांगत नाही. नाहीतर त्याच्यामध्येही विरोधक काड्या करण्याचं काम करतील. मनोज जरांगे पाटील यांच्याशी मी तीन दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, मी विनंती केली तू अॅडमिट हो, पण दुर्दैवाने न व्हावी ती घटना घडल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
विरोधकांकडून राजकारण केलं जातंय
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून राजकारण केलं जातंय. जालन्यात मराठा आरक्षासाठी आंदोलकांचं शांततेत आंदोलन सुरु होतं. पण आंदोलनात दगडफेक कोणी केली हे पाहावं लागणार आहे. काही समाजकंटक जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहचली आहे. विरोधक या मुद्द्यावरुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे.
वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशी करणार
मी एका सर्वसामान्य कुटुंबातील गरीब मराठा आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राची सेवा करत राहीन, असा शब्दच त्यांनी यावेळी दिला. या प्रकरणी जालन्याचे पोलिस अधीक्षकांसह उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं असून, अतिरिक्त महासंचालक सक्सेना या घटनेची चौकशी करणार आहेत. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नसून वेळ पडल्यास आम्ही न्यायालयीन चौकशी करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.