मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज बांधवांकडून ठिकठिकाणी आंदोलन, उपोषण सुरु आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. असे असताना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबात मोठी घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे निजाम काळातील महसूली नोंदी आहेत, त्यांना कुणबी दाखला देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यामध्ये ज्यांच्याकडे निजाम काळातील महसूली नोंदी आहेत, त्यांना कुणबी दाखला देणार आहे. विशेष म्हणजे याबाबत लवकरच जीआर काढण्यात येणार आहे. याशिवाय, जुन्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती कागदपत्रांची पडताळणी करणार आहे. ही समिती पुढच्या एक महिन्यात अहवाल सादर करणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
पाच सदस्यांची समिती गठीत
ज्यांच्याकडे निजाम काळातील महसूली नोंदी आहेत, त्यांना कुणबी दाखला देण्यात येणार आहे. त्यासाठी आपले अधिकारी हैदराबाद येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधतील. मी देखील तिथल्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधेन. यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठीत केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.