पुणे : उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळालं आहे. तर एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब शिवसेना हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने निर्णय दिला असून शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले आहे.
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणूकीसाठी हे पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह मिळाले आहेत.
शिंदे गटांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी तीन नावे पर्याय म्हणून आयोगाकडे दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनही शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावे सादर करण्यात आली आहेत.
दरम्यान, ठाकरे यांच्याकडून पक्ष चिन्हासाठी त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय देण्यात आला होता. तर शिंदे गटाकडून उगवता सूर्य, त्रिशुळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय दिला होता.