नवी मुंबई : नवी मुंबई येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात आयोजित सत्कार समारंभात उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तर इतर ५० जणांना उष्माघाताने त्रास झाला आहे. यातील काही जणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज ( १६ एप्रिल ) गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होते. नवी मुंबईमध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
दुपारची वेळ असल्याने उन्हाचा तडाखा जास्त होता. याचा उन्हामुळे कार्मक्रमाला हजेरी लावलेल्या लोकांची प्रकृती उष्माघाताने खालावली. मुंबईतील एमजीएम रुग्णालयामध्ये काही जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेट दिली त्यावेळी त्यांनी माहिती दिली त्यामध्ये ते म्हणाले. ही घटना दुर्दैवी, दुख:द आणि मनाला वेदना देणारी आहे.
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये सरकारी मदत दिली जाईल आणि उपचार घेत असलेल्यांचा खर्च शासन करेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.