पुणे : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बॅनरवर कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे विधान करून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व महापुरुषांना भिकारी संबोधणाऱ्या ‘भिकारी’ चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध… असा मजकूर लिहिलेला आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेवर फुली मारत त्यांच्या डोक्यावर ‘भिकारी’ लिहिलं आहे.
पिंपरी-चिंचवडमधल्या शाईफेकीनंतर अनेक आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चंद्रकांत पाटील यांना अटक करा’ या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. परंतु त्यापूर्वीच ससून हॉस्पिटलजवळ एक बॅनर लागलेला आहे, जो बॅनर सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
पैठणमधील एका कार्यक्रमात महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात जोरदार राजकारण तापलं आहे. पिंपरी-चिंचवड येथे समता दलाच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक झाल्यानंतर आज पुण्यातील ससून रुग्णालयाजवळ चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र या बॅनरवर एका अज्ञात व्यक्तीकडून चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेच्या कपाळावर ‘भिकारी’ असं लिहिलं आहे. यावरून आता पुण्यात नवा वाद रंगताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आजच या ठिकाणी भाजपकडून चंद्रकांत पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येणार असल्याने नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.