नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत रत्न जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली आहे.
पीएम मोदींनी ट्विटकरत लिहिले की, ‘श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. हे कळवताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी ते एक आहेत. भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे जीवन सुरू होते. आपले गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांचे संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले होते’.
विशेष म्हणजे लालकृष्ण अडवाणी हे भारताचे गृहमंत्रीही राहिले आहेत. अलीकडेच लालकृष्ण अडवाणी राम मंदिराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे वेगळीच चर्चा रंगली होती. मात्र, आता त्यांचा आणि त्यांच्या कामाचा सन्मान होतो आहे.