पुणे : राष्ट्रवादीत घराणेशाही असून काका-पुतण्यांचे राजकारण सुरु आहे. भ्रष्टाचाराविरोधात बारामतीत भरपूर काम करण्यासारखे आहे. त्यासाठी कोणाच्या दबावाला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी असून अशा दबावाला भ्यायचे कारण नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून बारामती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाला भेट दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना निर्मला सीतारामन बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, आमदार राम शिंदे, भीमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, योगेश टिळेकर, गणेश भेगडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, आदी उपस्थित होते.
एकाच कुटुंबावर छप्परफाड सोने पडते आहे. तालुक्यातील अनेक गावांना अद्याप पाणी नाही. समतोल विकास झालेला नाही. एकाच भागात सगळ्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. मंत्री सीतारामन यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. त्यांचे किती मंत्री, सदस्य जेलमध्ये गेले याचा त्यांनी विचार करावा. भाजपचे चरित्र्य असे नाही. ज्या बारामती मतदारसंघाच्या विकासाचा बोलबोला आहे, तेथे प्रत्यक्षात काही भाग सोडता अन्य ठिकाणी विकासाची वानवा आहे.
भाजपचे आमदार, लोकप्रतिनिधी असलेला भाग जाणिवपूर्वक विकासापासून वंचित ठेवला गेला आहे. भाजपचा पदाधिकारी, कार्यकर्ता असेल तर त्याला टार्गेट केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करत आहेत. त्यांची अशी कार्यशैली नाही. देशातील ११४ अविकसित जिल्ह्यांसंबंधी सध्या ते काम करत आहेत. त्यातील अनेक जिल्हे भाजप शासित नाहीत. परंतु विकासात राजकारण न आणता समतोल विकास साधण्यासाठी दरमहा पंतप्रधान तेथील जिल्हाधिकाऱयांशी बोलत आहेत.
दरम्यान, भाजप हा घराणेशाहीच्या विरोधात आहे. पक्षातील अनेकांनी महत्त्वाची पदे भूषवली. त्यात सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक आहेत. देशात काँग्रेसने घराणेशाहीचे राजकारण केले. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. आमचा लढा घराणेशाहीविरोधात आहे. जे पक्ष घराणेशाही चालवतात ते स्वतःच्याच घरातील लोकांना पुढे करतात. अमेठी, रायबरेलीत गेल्या ५० वर्षात झाला नव्हता एवढा समतोल विकास सध्या सुरु आहे. हे विकासाचे सूत्र लक्षात घेवून आम्ही काम करत असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.