पुणे : काँग्रेस आणि शिवसेना या दोन भिन्न विचारसरणीचे नेते आज ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने एकत्र दिसले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्याचा पाहुणचार घेऊन राहुल गांधी यांची यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हिंगोलीतून या यात्रेत आपला सहभाग नोंदवला. बाळासाहेबांचा नातू इंदिरा गांधी यांच्या नातवासोबत पायी चालतानाचं दृश्य कॅमेरात टिपण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती.
आदित्य ठाकरे यांच्यासमवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सचिन अहिर यांनी देखील भारत जोडो यात्रेत उपस्थिती दर्शवली. रस्त्याच्या दुतर्फा फुललेली गर्दी, शेतकरी कामगारांच्या आशादायी नजरा, चिमुकल्यांच्या डोळ्यात भविष्याची स्वप्नं आणि महिलांच्या मनी सुरक्षिततेची भावना… अशा सगळ्या भारलेल्या वातावरणात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा चार राज्यातून प्रवास करुन महाराष्ट्रात दाखल झाली.
नांदेडच्या देगलूरमध्ये राहुल गांधींचं आणि भारत जोडो यात्रेचं दणक्यात स्वागत झालं. राज्यात भारत जोडो यात्रा राज्यात येऊन आता चार दिवस झालेत. नांदेडमधून ही यात्रा आता हिंगोली जिल्ह्यात दाखल झालीये. मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातल्या लोकांचाही यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरेंनी यात्रेत सहभाग नोंदवून राहुल गांधींशी हस्तांदोलन केलं त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात शिवसेनेच्या भूमिकेचं स्वागत केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणिबाणीचं स्वागत करुन देशाला धक्का दिला होता. आता जाती-धर्म-पंथाच्या नावावर विखुरलेला देश जोडण्याची भूमिका घेऊन राहुल गांधींच्या भारत जोडोला आदित्य ठाकरेंनी पाठिंबा देऊन एक वर्तुळ पूर्ण केल्याची चर्चा आहे.