पुणे : बाळासाहेब थोरात हे सर्वमान्य नेतृत्व आहे. संगमनेर तालुका व जिल्ह्यासाठी हा आपला माणूस आपला स्वाभिमान आहे’ काँग्रेसमधील संघर्षामुळे अडचणीत सापडलेले आणि विरोधकांकडून टीकेचे लक्ष्य बनलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे समाजप्रबोधनकार निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर यांनी कौतुक केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील हरी बाबा मित्र मंडळाच्या वतीने कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्याची सांगता इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाने झाली यावेळी इंदुरीकर महाराज बोलत होते.
यावेळी आमदार सत्यजित तांबे, रणजीतसिंह देशमुख, कर्करोग तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, अजय फटांगरे, आयोजक तानाजी शिरतार, रमेश जेडगुले, व्यंकटेश महाराज सोनवणे, वैजयंती शिरतार, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते. यावेळी केक कापून आमदार थोरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यापुढे बोलताना इंदुरीकर म्हणाले,” अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येकाने शुद्ध आचार व शुद्ध आहार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या फॅशनच्या नावावर चाललेले संस्कृतीचे विद्रूपीकरण अत्यंत दुर्दैवी आहे. वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण व अपघाताचे प्रमाण ही मोठी चिंताजनक बाब आहे. चांगला आहार असेल तर माणूस निरोगी राहतो. यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या आहारात जास्त घेतल्या पाहिजे. याचबरोबर अपघात टाळण्यासाठी व्यसन करू नये, त्याचबरोबर वेगाची मर्यादा राखावी आणि सर्वात महत्त्वाचे मोबाईलवर बोलणे ही टाळले पाहिजे. यावेळी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या विविध बाबी लक्षात आणून देत चांगल्या सवयी, चांगली संस्कृती ,चांगला आहार यावर उपस्थित यांना प्रबोधन केले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले, “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याप्रमाणे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी संगमनेरचे नाव राज्य पातळीवर नेले आहे. सात दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी वेल्हाळे, मालदाड, घुलेवाडी यांसह परिसरातील भावी भक्तगण दररोज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान,बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली? याबाबतीत काँग्रेस पक्षाने आत्मचिंतन केले पाहिजे, शंभर वर्षे निष्ठेने एका पक्षाबरोबर राहिलेले जे परिवार आहेत, अशा लोकांवर ही वेळ का येते याबाबतीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे तांबे यांनी म्हटले.