अजित जगताप
वडूज : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सिद्धेश्वर कुरोली ते वडूज हुतात्मा स्मारक अशा पध्दतीने आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन शनिवार दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजता करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे यांनी दिली आहे
भारत देश यावर्षी स्वातंत्र्यांचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या निमीत्ताने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने विविध कार्यक्रमाने आयोजन केले आहे. त्याचाच भाग म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाने सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व खटाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने योगदान देणा-या कुटूंब व त्यांचे उत्तराधिकारी यांचा सन्मान व हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दरम्यान, यावेळी आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे उत्तरधिकारी यांचा सन्मान करून पदयात्रा निघणार आहे. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सचिव व खटाव माणचे नेते रणजितसिंह देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, तालुका अध्यक्ष डॉ.संतोष गोडसे, माजी अध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, अशोकराव गोडसे, राजुभाई मुलाणी, डॉ. महेश गुरव, प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्षसंजीव साळुंखे, युवक जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे यांच्यासह कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या संपूर्ण कार्यक्रमास खटाव तालुक्यातील देशप्रेमासाठी संघर्ष करणाऱ्या प्रामाणिक देशभक्ती करणाऱ्या व स्वतंत्र चळवळीचा इतिहास असलेल्या नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी ही विनंती केली आहे. राष्ट्रीय पोशाखात काँग्रेस कार्यकर्त्यानी एकत्रित जमावे असे ही सांगितले. यावेळी डॉ संतोष गोडसे, जेष्ठ नेते मोहनराव देशमुख, राहुल सजगणे, राजेंद्र माने, श्रीराम कुलकर्णी,सुरेश लंगडे, निलेश देशमुख व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते