Aurangabad News : औरंगाबाद : शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप, नाराजी, खुलासे सुरूच आहेत. यातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाविषयीही त्यांनी मत व्यक्त केले. जलील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना कुठेतरी वाटत असावे की, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे आणि आपण राज्यात राहावे. त्यामुळे ही जाहिरात दिली असावी. प्रत्येकाची एक महत्वकांक्षा असते. त्यातून हे घडलं असावं, असा खोचक टोला खासदार जलील यांनी लगावला आहे.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपची प्रथम पसंती फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना जलील म्हणाले की, फडणवीस हे केंद्रात खूप चांगले काम करू शकतात. त्यांचं भविष्यसुद्धा केंद्रातच आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपची प्रथम पसंती फडणवीस आहेत. (Aurangabad News) त्यांचे नेतृत्व देश उत्तम प्रकारे सांभाळू शकते. योगी आणि फडणवीस यांच्यात फडणवीस ही चांगली चॉईस असू शकते.
दरम्यान, जलील असेही म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकते. या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस नाराज देखील होऊ शकतात; कारण तेही मुख्यमंत्री राहिलेले आहेत, असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला.
जलील यांनी खासदार भागवत कराड यांच्यावर पाणी प्रश्नावरून प्रतिक्रिया व्यक्त केली. (Aurangabad News) २०१४ ला त्यांनी पाणी का दिलं नाही. जी पाणीपुरवठा योजना ७०० कोटी रुपयात पूर्ण झाली असती पण ती आज २ हजार ७०० कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. काहीही झालं तरी २०२४ पर्यंत पाणी येणार नाही, पाणी पुरवठा योजना पाहायला मलाही घेऊन गेले असते तर बरं झालं असतं, असा टोला त्यांनी भागवत कराड यांना लगावला आहे.
औरंगाबाद-पैठण रस्त्याचे काम भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भावाला दिले आहे. यामुळेच हे काम ४१ टक्के बिलोने घेतले आहे. त्यामुळे या विरोधात मी आवाज उठवणार, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे. (Aurangabad News) येणाऱ्या लोकसभा अधिवेशनात मी नितीन गडकरी यांना याबाबत प्रश्न विचारणार आहे. ४९० कोटी रुपयांचे काम २७० कोटी रुपयांमध्ये कसे काय होणार आहे? असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला आहे.