मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना उपचार घेण्यास अडचण काय? असा सवाल केला. त्याशिवाय, मनोज जरांगे यांना औषोधोपचार घ्यायला सांगा. सलाईन लावणं म्हणजे उपचार घेणं होत नाही, असे निर्देश हायकोर्टाने जरांगेंच्या वकिलांना दिले आहेत.
कोर्टात काय घडले?
जरांगेंना काल दोनवेळा सलाईन लावण्यात आली, असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केला. यावेळी महाधिवक्तांनी मनोज जरांगे डॉक्टरांना सहकार्य करत नाहीत, अशी माहिती हायकोर्टात दिली. यावर हायकोर्टाने उपोषणस्थळी डॉक्टर असणे, सलाईन घेणे म्हणजे उपचार घेणे असे होत नाही, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले. उपचार घेण्यात जरांगेंना अडचण काय? असा सवालही हायकोर्टाने केला.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद करताना जरांगेंच्या उपोषणाचा परिणाम म्हणून काल अनेक ठिकाणी बसची तोडफोड झाली, असे सांगितले. यानंतर हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले. मनोज जरांगे यांना उपचार घेण्याच्या सूचना कळवा आणि 4 वाजेपर्यंत कोर्टाला कळवा, असे निर्देश कोर्टाने दिले.
मनोज जरांगे यांच्याकडून प्रतिसाद नाही
मनोज जरांगे यांना उठता-बसताही येत नाहीये. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी एक ग्लास पाणी पिले. मुंबई हायकोर्टाचे निर्देश जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. ते आपल्या जागेवर झोपूनच आहेत.