राजेंद्रकुमार गुंड
माढा : माढा तालुक्यातील दारफळ सीनाचे रहिवासी तथा माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक दगडूलाल लुणावत हे सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या संचालकपदी ग्रामीण भागातून ३० पैकी २७ इतकी विक्रमी मते मिळवून विजयी झाले आहेत.
सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता मंगळवारी ३१ जानेवारी रोजी मतदान होऊन निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय झाला आहे. निवडणुकीत प्रचारादरम्यान मोठी चुरस व रंगत निर्माण झाली होती परंतु निकालातून तसे काहीच दिसून आले नाही.
सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले असून निकाल हा एकतर्फी लागल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधी गटाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. आज झालेल्या मतमोजणीत ६ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले असून यापूर्वीच शहरातील ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
संचालकपदी अशोक लुणावत यांचा मोठ्या फरकाने विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन माढेश्वरी बँकेचे चेअरमन आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे, सरपंच अशोक शिंदे, उपसरपंच कुमार शिंदे यांच्यासह माढेश्वरी बँकेचे संचालक मंडळ,अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईक आणि मित्रमंडळींनी केले आहे.