मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) मार्फत चौकशी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळालेला आहे. सोमवारी ( ता. १२) मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली.
यावेळी न्यायलयाने अनिल देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या एकल खंडपीठाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आता न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर केला. 1 लाखांच्या जातमूचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.