बारामती : जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून सुरू आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोणत्याच पक्षाच्या नेत्याकडून तसेच प्रवक्त्याकडून, पक्षप्रमुखांकडून अशा प्रकारची वक्तव्य होऊ नयेत, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती येथे विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी अजित पवार यांचा आज दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पवार बोलत होते.
“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार होते. मात्र मध्यंतरी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते सहभागी होऊ शकले नाहीत. यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी अशा पद्धतीने यात्रा काढून आपापल्या पक्षासाठी जनमताचा कौल घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व काही प्रमुख कार्यकर्ते शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते. माझी यासंदर्भातली भूमिका मंगळवारच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार आहे, असे पवार म्हणाले.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. शरद पवार हेच राष्ट्रवादीचे भोंदुबाबा आहे आणि त्यांनी जादुटोणा करून उद्धव ठाकरेंना जाळ्यात ओढलं, असे बावनकुळे साताऱ्यात दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर उतरून बावनकुळें विरोधात निदर्शनं केली होती.