शिरुर, (पुणे) : संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसेविगिरी असते. या पुरस्कारांना काही अर्थ नसतो, अशा प्रकारचे वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे. शिरुरमधून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी २७ मार्च ला आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संसदरत्न किताब पटकावणाऱ्या अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, आढळराव पाटलांनी हे वक्तव्य अमोल कोल्हे यांना डिवचण्यासाठी केले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही यंदा संसदरत्न हा पुरस्कार जाहीर झाला होता. हे आढळरावांच्या लक्षात न आल्याने या पुरस्कारावरुन बारणे आणि कोल्हेंना टोला लगावला असला तरी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांच्या या वाग्बाणामुळे विरोधकांपेक्षा मित्रपक्षच अधिक घायाळ झाला, अशी चर्चा सुरु आहे.
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत याच मुद्द्यावरुन शिवाजीराव आढळराव पाटील याना धारेवर धरले आहे. खासदारांना देण्यात येणाऱ्या संसदरत्न पुरस्कारांना काही अर्थ नसतो, ते चेन्नईत बसवून ठरवले जातात, असे आढळराव पाटील म्हणाले आहेत. मात्र, ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी खासदारांना संसदरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात केली. कोणत्याही संस्थेने या पुरस्कारांची सुरुवात केली नव्हती. त्यामुळे या पुरस्काराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य गोष्ट नाही. श्रीकांत शिंदे यांनाही संसदरत्न पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे तु्म्ही त्यांच्याबाबतही असंच बोलणार का? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवार यांच्यावर जोरदार टीका
पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, माझा काका कोणी फार मोठा अभिनेता आहे म्हणून मला बोटाला धरुन आणलं आणि अभिनेता केलं, असे झालेले नाही. मी स्वत:च्या कष्टाने हे सगळं केलं. मी MBBS डॉक्टर झालो ते माझा काका कोणीतरी डॉक्टर होता म्हणून मला एमबीबीएसची सीट मिळाली, असे झाले नाही. मी स्वत:च्या कष्टाने डॉक्टर झालो.
या सगळ्या शिक्षणानंतरही मला सहजपणे टार्गेट केले जाते. माझा राजकारणाचा पिंड नाही, असे अजित पवार म्हणतात. याचा अर्थ नेमका काय? माझं भ्रष्टाचारात नाव आलं नाही, म्हणजे माझा राजकारणाचा पिंड नाही का? आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी किंवा काका राजकारणात नसलेल्या मुलांनी राजकारण किंवा समाजकारणात यायचेच नाही का?, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारला आहे.