पुणे : “भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्या आहेत. आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि.21) काल पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो. यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर अभिष्टचिंतनांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळीच अजित पवार यांना दूरध्वनी करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अजित पवार यांनीही अमित शहा यांचे शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीने ट्विट करत दिली. काल अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती आणि आज अजित पवारांना फोन करुन शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
मी येतोय माझ्या जन्मभूमीतल्या माता-भगिनींना भेटायला..
मी येतोय तुमच्याशी संवाद साधायला..स्त्री सक्षमीकरणासाठी बजेटमध्ये जाहीर केलेल्या ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा आणि माझ्या माय माऊलींशी संवाद साधण्यासाठी मी येतोय तुमच्या भागात, तुमच्या भेटीला..
उद्या,… pic.twitter.com/WO2xSoNRvh
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 21, 2024
दरम्यान, अजित पवार यांचा हा दौरा नेहमीपेक्षा वेगळा असून सभा न घेता थेट महिलांशी संवाद साधला जाईल आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नगर दक्षिण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भर राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिली आहे.
तसेच अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी नागपुरमध्ये अजित दादांना अभिष्टचिंतन करणारे पोस्टर्स लावले आहे. विशेष म्हणजे या पोस्टर्स वर “लाडक्या बहिणींचा लाडका दादा” अशा आशयाने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठीचा श्रेय अजित दादांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.