पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी म्हणजेच उद्या मतदान होणार आहे. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावरील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पुणे शहर पोलिसांनी दिले आहेत. मतदान केंद्राच्या परिसरातील भोजनालये आणि बार बंद ठेवण्यास सांगितले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.
कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी १८ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. मतदान रविवारी (ता.२६) होणार असून २ मार्चला निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. कसबा मतदार संघात समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक आणि दत्तवाडी पोलीस ठाणे येतात. निवडणुकीसाठी ७६ मतदान केंद्रांवर एकूण २७० बूथ तयार करण्यात आले आहेत.
शांततेत आणि सुरळीत मतदान व्हावे आणि सार्वजनिक शांतता आणि मालमत्तेला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी पोलिसांनी या उपाययोजना केल्या आहेत. त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाचा मतदार नसलेल्या किंवा राजकीय पक्षाचा सदस्य नसलेल्या कोणत्याही राजकीय व्यक्तीला मतदारसंघात राहण्यास किंवा राहण्यास बंदी घातली आहे.
दरम्यान, पुण्यात रविवारी मतदान असल्याने पोलिसांनी आस्थापने बंद ठेवण्यासाठी आदेश काढले आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरातील दुकाने, टपऱ्या रविवारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी हे आदेश काढले असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.