पुणे : तात्या कधी येताय.. वाट पहातोय… म्हणताना राष्ट्रवादाची नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत सहभागी होण्याची ऑफर दिली. अजित पवार यांच्या सारख्या नेत्यानेच थेट ऑफर दिल्याने वसंत मोरे भविष्यात नक्की कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील एका विवाहाच्या निमिताने अजित पवार व वसंत मोरे यांची भेट झाली होती. यावेळी दोघांनी देखील हस्तांदोलन केले. यावेळी थेट अजित पवार यांनीच कधी येताय, वाट पहातोय असे म्हटले. अजित पवारांच्या थेट बोलण्याने वसंत मोरे देखील काही क्षणांसाठी गडबडले. स्मित हास्य करत त्यांनी वेळ मारून नेली. वसंत मोरे यांच्या स्मित हास्यातच अनेक अर्थ दडले असू शकतात, यावर चर्चाना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांचे खंदे समर्थक समजले जाणारे नीलेश माझिरे यांची माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. नीलेश माझिरे यांनी देखील मनसेला जय महाराष्ट्र केला असून त्याबरोबरीने सुमाराने ४०० कार्यकर्त्यांनी देखील मनसेला सोडचिट्ठी दिली आहे.
यामुळे वसंत मोरे यांची चलबिचल होत आहे. असे असताना देखील राष्ट्रवाचीचे नेते मला जाहीर निमंत्रण देत आहेत, ही मी करत असलेल्या कामाची पावती असून अजूनही मी मनसे सोडण्याचा विचार केलेला नाही, असे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपुर्वी पक्षाच्या बैठकीला बोलावले जात नाही, भाषण करू दिले जात नाही, असा घराचा आहेर मोरे यांनी देत आपली नाराजी बोलून दाखविली होती. याचाच फायदा घेताना अजित पवार यांनी मोरेंना थेट ऑफर देण्याची चाल खेळली असल्याची चर्चा आहे.
मात्र, मोरे यांनी यावर कोणतीहि टिपणी केली नसल्याने, ते नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.