Ajit Pawar पुणे : राज्यात सध्या दोन व्यक्तींची चांगलीच चर्चा रंगली आहे. राजकारणातील फडात विरोधी पक्ष नेते अजित पवारांची तर नृत्याच्या फडात गौतमी पाटीलची. राजकारण हे देखील आजकाल मनोरंजनच झाले आहे की काय असे आता सामान्य जनतेला वाटू लागली आहे. काही झाले तरी अजित पवारच वादात सापडतात. तर दुसरीकडे गौतमीचा कार्यक्रम असला की वाद किंवा चर्चा ठरलेलीच असते. आता अशाच एका गोष्टींवरुन पवार आणि गौतमी जनतेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
गौतमी पाटीलच्या नावाची सध्या महाराष्ट्रात चलती आहे. लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटीलाच आणण्याचे नियोजन केले जाते. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गौतमी पाटीलने डान्स केला आहे. डान्सचा तो व्हिडीओ समाज माध्यमावर तुफान व्हायरल होत आहे.
गौतमीही कोणताही कार्यक्रम नाकारत नाही. मग वाढदिवसाचा कार्यक्रम असो की सार्वजनिक कार्यक्रम. मुळशीत तर गौतमी चक्क बैलासमोर नाचली. बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमी लचकत, मुरडत नाचली. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
बावऱ्या बैल हा शर्यतीचा बैल आहे. या बावऱ्याने अनेक शर्यती गाजवल्या आहेत. गावचा सर्वात लाडका हा बैल आहे. मानाचा बैल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सर्वच गावकरी या बैलाची राखण करतात. त्याची देखभाल करतात. गावची शान असलेल्या या बैलाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतून अनेक लोक येत असतात. त्यामुळे हा बैल नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळेच या बावऱ्या बैलासाठी थेट गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
अजित पवार यांनी प्रतिक्रिया…!
बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमीने डान्स केला याबद्दल पुण्यात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर ‘तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय,’ अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली आहे
बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेच साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडं पाहते. लहान मुलाचं बारसं आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलं, तर तिला नाचावच लागतं. बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे. असे अजित पवारांनी यावेळी सांगितलं.