पुणे : गेल्या दोन वर्षांत राज्यातील जनतेने अनेक राजकीय भूकंप अनुभवले आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांसह महायुतीत दाखल झाले. वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असताना, मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो, असे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
निती आयोगाच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दिल्लीत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्यापूर्वी काय-काय आणि कसं-कसं जुळवून आणलं? याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.
महायुतीत सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दहा वेळा बैठका झाल्या होत्या, असंही अजित पवार यांनी सांगितलं. दिल्लीत त्यांच्या या बैठका झाल्या. त्यासाठी सामान्य विमानाने ते प्रवास करत होते. मास्क आणि टोपी घालून त्यांचा दिल्ली-मुंबई, मुंबई-दिल्ली असा प्रवास करत होते. त्यांच्या या पेहरावामुळे सह प्रवासी सुद्धा आपल्याला ओळखत नसल्याचा किस्सा त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितला.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात 23 जुलैला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र, नीट यूजी परीक्षेसंदर्भातील सुनावणी दिवसभर सुरु राहिल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला वेळ मिळाला नाही. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी या संदर्भातील प्रश्न सरन्यायाधीशांसमोर मांडला. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीसंबंधीची सुनावणी 29 जुलै रोजी तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलै रोजी होणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच अजित अनंतराव पवार या नावाऐवजी ते A. A. Pawar अशा नावाने प्रवास करायचे. याच नावाने बोर्डिंग पास तयार व्हायचा. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी जवळपास 10 बैठका त्यांनी अमित शाह यांच्यासोबत केल्या. अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना हा खुलासा केला आहे.