पिंपरी : विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात आता राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्षात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे समोर येत आहे. विधानसभा निवडणूकआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार पडलं आहे. अजित पवार गटाचे 39 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील 39 पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशाची तारीख सुद्धा ठरली आहे. येत्या 20 तारखेला हा पक्षप्रवेश होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची ताकद मात्र वाढणार आहे.
अजित पवारांना धक्का
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची जादू चालली नाही. अजित पवार गटाला केवळ रायगडची जागा जिंकता आली. त्यातच आता राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. असं असतानाच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील 39 पदाधिकांऱ्यांनी अजित पवारांची साथ सोडणार असून ते आता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
पिंपरी- चिंचवड हा आजवर अजित पवार यांचा बालेकिल्ला राहिला आहे. या पवार यांची ताकद मोठी आहे. राष्ट्रवादीत फूट पडण्याआधीही पिंपरी- चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांना मानत होते. त्याचमुळे अनेकांनी शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांसोबत महायुतीत जाणं पसंत केलं. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. यावेळी पक्षातून बाहेर गेलल्यांना परत पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा पक्ष सोडून गेलेलं लोक परत येण्याबाबत मला कोण भेटलं नाही. पण जयंत पाटील यांना भेटले आहेत. याची मला माहिती आहे, असं शरद पवार म्हणाले.