पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. तर 233 जागांवर महायुतीने यश मिळवलं आहे. तर 132 जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेमुळे महायुतीला हे यश मिळालं असल्याची टीका केली जात होती.
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजना राबवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. तसेच आता निकालानंतर सरकारकडून पैसे मिळणार नसल्याचं देखील बोललं जात आहे. यादरम्यान, विरोधकांच्या टीकेवर अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार…?
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठीच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली, अशी जाहीर कबुली अजित पवार यांनी दिली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार यांनी आढाव यांची भेट घेतली. आढाव यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर पवार यांनी भूमिका मांडली. त्यानंतर माध्यमांची संवाद साधताना एका प्रश्नाला उत्तर देताना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच लाडकी बहीण योजना आणल्याची कबुलीच त्यांनी दिली.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पाच महिन्यांपूर्वी लोकसभेला आमचा पराभव झाला. त्यानंतर आम्ही सर्वजण बसलो आणि योजना आणली. सगळ्या राज्यांनी काही ना काही योजना आणल्या. कोणी पाणी, वीज मोफत दिली; तर कोणी प्रवास मोफत दिला. महिलांना मदत दिली, तर बिघडले कुठे? इतर राज्यांनी दिले, तर ते प्रलोभन नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.