Ajit Pawar | नागपूर : मला एक कळत नाही की माझ्यावर सगळ्यांचं प्रेम एवढं का ऊतू चाललंय? मी दोन दिवस बघतोय, गुलाबराव पाटील बोलले, उदय सामंत बोलले, दादाजी भुसे बोलले. अनेकांची वक्तव्य मी ऐकली. या सगळ्यांचं एवढं प्रेम का उतू चाललंय ते कळायला मार्ग नाही. असे मिश्कीलपणे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. नागपूरमध्ये आज महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ही टिप्पणी केली आहे.
मागची वज्रमूठ सभा झाल्यानंतर अजित पवार यांना एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला होता की देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन काहीही बोलला नाहीत. त्यांच्याविषयी सॉफ्टकॉर्नर आहे का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “तुमची सूचना लक्षात घेतली. पुढच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन बोलणार.
मला जर बोलायची संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन भाषण करणार. तुमची सूचना अजित पवारने स्वीकारली. नागपूरच्या सभेत मला जर बोलायची संधी दिली तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन मी बोलेन.” त्यामुळे आजच्या सभेत अजित पवार फडणवीस यांचं नाव घेऊन टीका करणार का हे देखील औसुक्याचं ठरेल.
शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणाविरोधात महाविकास आघाडीची दुसरी सभा नागपूरमध्ये होत आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमिळून ही सभा असणार आहे.