Political | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे मंगळवारी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. अजित पवारांनी स्वत: प्रसार माध्यमांना सामोरे जात या केवळ वावड्या असल्याचे स्पष्ट केले. तसेच जीवात जीव असे पर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे या बातम्यांवर आता पडदा पडला आहे. मात्र अशा बातम्या कोणी पेरल्या यावर चर्चा सुरुच आहेत.
अजित पवारांनी इतर पक्षाचे नेते आणि त्यांची मुखपत्रे असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि सामनावर टीका केली. तसेच त्यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार काय असेही विचारले होते. यानंतर अजित पवारांबाबतच्या बातम्या संजय राऊतांनीच पसरवल्याचाही आरोप होतोय. त्यावर बुधवारी (१९ एप्रिल) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
अजित पवार भाजपाबरोबर जाण्याच्या बातम्या पसरवण्यात संजय राऊतांची भूमिका आहे का? या प्रश्नावर, सुरुवात तर संजय राऊतांनीच केली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांना जाऊन भेटले. त्यानंतर या बातम्यांना पेव फुटला. त्यामुळे अजित पवारांनी स्पष्ट केलं की, सुरुवात कुणी केली. त्यामुळे संजय राऊत शरद पवारांचं ऐकतात की आणखी कुणाचं ऐकतात याबद्दल मला काही बोलायचं नाही. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
आमच्याकडून अशी कोणतीही चर्चा नाही. मी अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का लागेल किंवा जी गोष्ट घडलीच नाही, त्याविषयी मी चुकीची माहिती सांगणार नाही. कुणीच अशी चुकीची माहिती देऊ नये. अजित पवारांनी भाजपाशी कोणताही संपर्क केलेला नाही. भाजपाही त्यांच्या संपर्कात नाही. अजित पवारांचे विरोधक या बातम्या तयार करत असतील, असा आरोपही बावनकुळेंनी केला.