(Ajit Pawar) मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे काही आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. तसेच आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक पाहण्यास मिळणार का? राज्याची सत्तासमीकरणे बदलणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
कारण अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे. अशा चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांनी आज त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर देखील डिलीट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे. या ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. जर वेळ आली तर राज्यपालांना हे पत्र अजित पवार देतील. त्यामुळे सरकारला धोका निर्माण होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर हे पाऊल अजित पवार उचलतील, असे वृत्तात म्हंटले आहे.
या प्रकरणावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. अजित पवार कुठेही जाणार नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही ते म्हणाले आहेत. तर अजित पवार भाजपसोबत आल्यास शिवसेना सत्तेबाहेर असे वक्त्यव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे.
राष्ट्रवादी आणि समविचारी सहकारी पक्ष मिळून शक्तिशाली बनण्याचे प्रयत्न सुरू आहे. तुमच्या मनात जी गोष्ट आहे ती आमच्या मनात अजिबात नाही. कोणीतरी बातम्या पसरवत आहे. १०० टक्के असं काहीच घडलेलं नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.