दिल्ली : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून दहा दिवसांच्या वर उलटून गेले तरीही अद्याप सत्ता स्थापन होऊ शकली नाही. गृहखात्यावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रस्सीखेच सूरु आहे. तर तिकडे आपल्या पदरात महत्त्वाची खाती पडावी यासाठी अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसेल आहेत. मात्र अजूनही अजित पवार आणि अमित शाह यांची भेट होऊ शकलेली नाही. अर्थमंत्री राष्ट्रवादीकडेच राहावं, मंत्रिमंडळात 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदासाठी अजित पवार आग्रही असल्याचे बोलले जात आहे. तसेच केंद्रात एक कॅबिनेट आणि एका राज्यपाल पदाची देखील अजित पवारांची मागणी आहे. या पैकी कोणत्या मागण्या पूर्ण होतात आणि त्यासाठीच्या चर्चेकरीता अजित पवार आणि अमित शाहांची भेट आज तरी होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? याचा फैसला आज होणार आहे. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 10 वाजता मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदार आपला विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावर मोहोर उमटवतील. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल अशीच चर्चा आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे जवळपास निश्चित झाले आहे.
महायुती आज करणार सरकार स्थापनेचा दावा..
भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर, महायुती सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटून, तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहेत. भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी मुंबईत दाखल झाले आहेत. तर निर्मला सीतारामन देखील मुंबईत पोहचल्या आहेत. हे दोन्ही निरीक्षक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेणार आहेत. महायुतीत एकी आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी ही भेट असणार आहे. असं बोल जात आहे.