मुंबई : नागपूरला एअरबस प्रकल्प येऊ नये, म्हणूनच गुजरातला जाऊ दिला. असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर एअरबस प्रकल्प हा गुजरातला गेला हे उद्धव ठाकरे यांना माहिती होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले सुद्धा होते. महाराष्ट्रातील वातावारण उद्योगासाठी पोषक नसल्यानेच हा प्रकल्प गुजरातबाहेर गेल्याचा दावा करतानाच नागपूरला एअरबसचा प्रकल्प जाऊ नये म्हणूनच हा प्रकल्प गुजरातला जाऊ दिला असावा असा माझा कयास आहे, अशी शंकाही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन वेदांता फॉक्सकॉन आणि एअरबस प्रकल्पावरून तत्कालीन ठाकरे सरकारचीच पोलखोल केली. यावेळी फडणवीस यांनी पुरावे सादर करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना तोंडघशी पाडले. २३ सप्टेंबर २०२१ रोजी पेपरात बातमी आली. टाटा एअरबस प्रकल्पाचे गुजरात, उत्तर प्रदेशात प्लांट लागणार. २२ हजार कोटींची डील झाली. हे छापून आले होते. तेही अनेक पेपरात छापून आली होती. १४ फेब्रुवारी २०२२ मध्येही एक बातमी छापून आली होती. त्यावेळी राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते.
दरम्यान, आम्ही विरोधी पक्षात गेलो म्हणजे आपले राज्य विसरत नाही. मला ज्या क्षणी कळलं गुजरातला जाण्याचा निर्णय टाटा एअरबस करतंय. तेव्हा मी त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. २०१६ मध्ये पहिल्यांदा टाटा आणि एअरबसचं बोलणं सुरू झालं. त्यांचा करार झाला नव्हता. तेव्हा मी टाटांकडे गेलो. तुम्ही नागपूरला प्रकल्प आणा अशी मी त्यांना विनंती केली. त्या दिवसापासून मी या प्रकल्पाचा फॉलोअप केला. त्यांची टीम नागपूरला आणली. त्यावेळी गुजरात आणि महाराष्ट्र दोघेही स्पर्धेत होतो, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
टाटाच्या टीमला नागपूरमध्ये जागा दाखवली. गुजरात तुम्हाला जे देईल त्यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला देऊ असे सांगितले. त्यानंतर २४ एप्रिल २०२१ ला या प्रकल्पाच्या प्रमुखाला सागरवर बोलाविले. त्यांना सांगितलं तुम्ही गुजरातला जाऊ नका. तुमच्या काय अडचणी असतील तर मी विरोधी पक्षनेता म्हणून आणि ज्येष्ठ नेता म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जायला तयार आहे. तुमच्या अडचणी सोडवायला तयार आहे. त्यावेळी ते म्हणाले, देवेंद्रजी, यहाँ का महौल इन्व्हेस्ट करने जैसा नही है, त्यानंतर तरीही बोर्डला विचारून सांगतो असं सांगितल्याचा गौप्यस्फोटही देवेद्र फडणवीस यांनी केला आहे.