दिल्ली : ‘वंदे भारत ट्रेन”च्या यशानंतर आता देशात भारतीय रेल्वे २०२४-२५ मध्ये ‘वंदे मेट्रो ट्रेन’ सुरू करणार आहे. अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल बुधवारी (ता.१) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वरील मोठी घोषणा केली आहे.
अधिक बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाल्या कि, वंदे मेट्रो ट्रेन ही शहरांमध्ये ५०-६० किमी अंतर कापण्यासाठी संकल्पना घेऊन येत आहे. या वर्षी उत्पादन आणि डिझाइनचे काम केले जाईल. पुढील वर्षापासून ते सुरू करण्याचे नियोजन आहे. वंदे मेट्रो १२५ ते १३० प्रति किलोमीटर वेगाने धावणार आहे. त्याची रचना मुंबई उपनगराच्या धर्तीवर केली जाणार आहे. मात्र, वंदे मेट्रोमध्ये शौचालयाची सुविधा असणार नाही.
१० वर्षांपूर्वी दररोज ४ किमीचे नवीन ट्रॅक बनवले जात होते. आज दररोज १२ किमीचे नवीन ट्रॅक टाकले जात आहेत. पुढच्या वर्षी ही क्षमता १६ किमी पर्यंत नेली जाईल. अनेक दशकांच्या उणिवा ८ वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करूनच मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी होईल. यानंतरच वेटिंग लिस्ट हद्दपार करण्याबाबत काही सांगता येईल. रेल्वे तिकीटातील वेटिंग
लिस्ट संदर्भात बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वंदे मेट्रो ट्रेन १९५० आणि १९६० च्या दशकात डिझाइन केलेल्या अनेक ट्रेनची जागा घेईल. वंदे मेट्रो ट्रेनच्या डिझाईनबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र त्यातील सुविधा काही प्रमाणात वंदे भारत गाड्यांप्रमाणेच असतील, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, रेल्वेला ७० हजार कोटींची कमाई अपेक्षित भारतीय रेल्वेने आपले उत्पन्न आणि खर्चाचा तपशीलही अर्थसंकल्पात दिला आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात प्रवाशांकडून ७०,००० कोटी रुपयांची कमाई झाल्याचा अंदाज आहे, जो गेल्या अर्थसंकल्पीय सत्रात ६४,००० कोटी रुपये होता. त्याच वेळी, मालवाहतुकीतून यंदा १.७९ लाख कोटी रुपयांची कमाई अपेक्षित आहे, जी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १.६५ लाख कोटी रुपये होती.
‘वंदे मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये
ट्रेनचे इंजिन पूर्णपणे हायड्रोजन आधारित असेल. त्यामुळे प्रदूषण शून्य होईल. वंदे भारत ट्रेनप्रमाणे या ट्रेनमध्येही आधुनिक ब्रेक सिस्टिम, रेड सिग्नल ब्रेकिंग टाळण्यासाठी कवच सुरक्षा यंत्रणा, ऑटोमॅटिक डोअर, फायर सेन्सर, जीपीएस, एलईडी स्क्रीन या सुविधा असतील. ज्यामुळे प्रवाशांना पुढील स्टेशनची अगोदर माहिती मिळेल. या ट्रेनचे भाडे खूपच कमी असेल, जेणेकरून गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांनाही प्रवास करता येईल.