कोल्हापूर : “मी मंत्री झालो, त्यावेळी घरासमोर लोकांची इतकी गर्दी होत होती, की दोन किलोमीटर गाडीच्या रांगा होत्या, मंत्री झालो की पीए वाढवले, अधिकारी आले, लोकं कौतुक करू लागली. लोकं म्हणायची भाऊ तुमच्यासारखा मंत्री नाही, पण कौतुक माणसाला फसवत असतं, मंत्रिपद गेलं आणि भरलेल्या कणसातील दाणं संपल्यावर पाखरं उडून जातात, तशी पाखरं देखील उडून गेली आणि मी एकटाच राहिलो, एक पण कौतुक करणारा राहिला नाही, अशी व्यथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोतोली इथ आयोजित केलेल्या पत्रकार दिन आणि गुणगौरव कार्यक्रमात खोत बोलत होते. कौतुक हे तुमच्यासाठी आहे की पदासाठी हे ओळखायला पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी सर्वांना दिला आहे.
पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, बातमी कशीही येऊ दे, आज वाईट बातमी आली, तर उद्या चांगलीपण येते, पण आपली बातमी आलीच पाहिजे. कारण बातमी आली तरच समाजाला कळेल हा गडी अजून जिवंत आहे. माणूस चर्चेतून संपला की त्याचं मूल्य संपतं. त्यामुळे माणूस हा नेहमी चर्चेत असला पाहिजे. मला अनेक जण विचारतात तुम्ही राजू शेट्टींवर का बोलता? पण मी त्यांना सांगतो, राजू शेट्टींवर बोललो नाही तर चर्चाच होत नाही. मी बोललो तर राजू शेट्टीही बोलतात. त्यामुळे पुढील दोन तीन दिवस दोघे जण चर्चेत राहतो, असं खोत मिश्कीलपणे म्हणाले.
मंत्री असताना किती चौकशी समित्या नेमल्या मलाच माहिती नाहीत. मी मंत्री असताना अधिवेशन काळात पहाटे चार वाजेपर्यंत अभ्यास करायचो आणि सभागृहात पूर्ण तयारीने जायचो, पण प्रश्न उत्तर सुरू झाले की कागदच सापडत नव्हते, तेव्हा मी एकनाथ खडसेंचा सल्ला घेतला. त्यावेळी त्यांनी सभागृहात बसून राहावं आणि एखादा प्रश्न आला की म्हणायचं सन्माननीय सदस्य निश्चित याला न्याय मिळाला पाहिजे.
चौकशी करू, समिती नेमू आणि दोषींवर कारवाई करू, असे म्हणायचे, यानंतरही पुन्हा प्रश्न विचारला तर चौकशी समिती नेमली जाईल, असं म्हणायचं आणि त्याप्रमाणे मी म्हणू लागलो, पण आजपर्यंत किती चौकशी समित्या नेमल्या आणि कुणाला नेमल्या हे मलाच पत्ता नाही. मात्र या सल्ल्यानंतर मी सभागृहात अभ्यास करायचा बंद केला. मधल्या वाटेने पळून जाता येतं हे मला कळालं, पण एकनाथ शिंदे यांच्यासारखे नाही, असे सदाभाऊ खोत यावेळी भाषणात म्हणाले आहेत.