लोणी काळभोर : अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो. परंतु, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच गौरी गायकवाड यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले.
गौरी गायकवाड यांचा शनिवारी (ता.२६) वाढदिवस होता. गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त नवपरिवर्तन फाउंडेशनच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळच्या सत्रात उद्योजिका महिलांना आपला व्यवसाय स्टॉलच्या माध्यमातून अधिक महिलांपर्यत पोहोचवण्यासाठी भव्य स्टॉल प्रदर्शन, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा, मेकअप हेअर स्टाईल स्पर्धा, उखाणे स्पर्धा, महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळच्या सत्रात महिलांसाठी खास मंगळागौरी ग्रुप कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आली. तसेच यावेळी महिलांनी आपली पारंपरिक व संस्कृती जपत अतिशय सुंदर नृत्य सादर केले. यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या.
या सर्व स्पर्धांना परीक्षक म्हणून डॉ. उज्ज्वला काळभोर, प्रा.भाग्यश्री भिकोले, प्रियांका ढम, मनीषा राऊत कामकाज पाहिले. उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून पहिल्या ८५ महिलांना विशेष भेटवस्तू देण्यात आली. तर उर्वरित सर्व महिलांना गिफ्ट कूपन देण्यात आली.
दरम्यान, वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य खर्च करत असतात. मात्र, हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत माजी सरपंच गौरी गायकवाड यांनी यांनी हा सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कदमवाकवस्ती, लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
यावेळी हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, लोणी काळभोरच्या माजी सरपंच वंदना काळभोर, माधुरी काळभोर, पुनम चौधरी, कावेरी कुंजीर, उपसरपंच नासिर पठाण, ललिता काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, भारती काळभोर, संगीता काळभोर, राजश्री काळभोर, बिना काळभोर, सिमिता लोंढे, मंदाकिनी नामुगडे, राणी बडदे, वंदना काळभोर, रोहिणी तुपे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.