मुंबई : मागील आठवड्यात अजित पवारांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे परंतु शरद पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांनी विधानसभेत मांडण्यापूर्वीच फुटला होता, असा दावा केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर काही नेत्यांनी सुद्धा अजित पवारांना लक्ष्य करताना हा आरोप केला. याच आरोपांना आता अजित पवारांनी विधानसभेत आपल्या भाषणा दरम्यान सडेतोड उत्तर दिल आहे.
मी एक गोष्ट स्पष्ट करतो…
अर्थमंत्री अजित पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांच्या ‘अर्थसंकल्प फुटला’ या आरोपाला उत्तर दिलं आहे. “भाषणाच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट स्पष्ट करतो. अर्थसंकल्प फुटल्यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनी विधान केलं. हे दोन्ही सदस्य अतिशय ज्येष्ठ आहेत. अर्थसंकल्पापूर्वी वर्तमानपत्रात नेहमीच अर्थसंकल्पातील तरतुदी छापून आल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला.
जयंत पाटील यांनी तर ९ वेळा अर्थमंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. अर्थसंकल्पाकडून नागरिकांच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षांचा कानोसा घेऊन माध्यमांमध्ये त्यावर चर्चा होत असते. त्यासंदर्भातल्या बातम्या छापल्या जात असतात. लोकांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब त्यात दिसत असतं, असं अजित पवार म्हणाले.
“अर्थसंकल्पापूर्वी काही बातम्या वर्तमानपत्रांत, माध्यमांमध्ये आल्या म्हणजे अर्थसंकल्प फुटला असं म्हणता येणार नाही. हे सदस्य तसं म्हणत असतील तर ते माध्यमांवर अन्याय करणारं आहे. मी स्पष्टपणे सांगतो, की अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही. त्याची गोपनीयता पूर्णपणे राखली गेली आहे”, असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.
अर्थसंकल्पा संदर्भातली माहिती आधी बाहेर येता कामा नये.
शरद पवार यांनी २९ जुलै रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना अर्थसंकल्पावर खोचक टीका केली होती. तसेच, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच फुटल्याचा आरोप केला होता. “अर्थसंकल्पा संदर्भातली माहिती आधी बाहेर येता कामा नये. कारण त्याला अर्थसंकल्प फुटला असं म्हणतात. काल अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत अर्थसंकल्पात काय काय येणार आहे, ते छापून आलं होतं”, असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या याच आरोपांवर अजित पवारांनी विधिमंडळात सडेतोड उत्तर दिलं आहे.