अजित जगताप
सातारा : आज ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात देशभर साजरा होत आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना सातारा शहरांमध्ये झालेल्या ७३ व्या प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक आमदार- खासदार उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे शिंदे गटाचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी ध्वजारोहण करून आपलं कर्तव्य पार पाडले. दरम्यान भाजप व शिंदे गटांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची दबक्या आवाजात चर्चा होऊ लागली आहे. तर क्रीडा संकुल येथील अनेक आसन रिकामे दिसत होते.
याबाबत समजलेली माहिती अशी की ,सातारा येथील छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी आज सकाळी सव्वानऊ वाजता ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य आणि दिव्य नियोजन करण्यात आले होते. यासाठी विद्यार्थी, विजेते स्पर्धक, अधिकारी, पालक वर्ग उपस्थित होते.
सव्वा नऊ वाजता आदरणीय पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी तिरंगा ध्वजारोहण केले.
या सोहळ्याला जिल्हाधिकारी यापासून ते वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परंतु, भाजपचे साताऱ्यातील आमदार- खासदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातील आजी माजी सदस्य उपस्थित नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले .या कार्यक्रमाला शासकीय स्वरूप असले तरी स्थानिक आमदार- खासदारांची तसेच मान्यवरांची अनुपस्थिती ही सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
पाटण शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांनी गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करून आपली राजकीय घोडदौड कायम ठेवली आहे. पूर्वी ते वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता सातारा व ठाणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. सातारा होमपीच असल्याने तसेच पालकमंत्री म्हणून त्यांनी कुशलतेने जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण व बक्षीस वितरण तसेच पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले.
या वेळी शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित होते. मात्र, सातारा जिल्ह्यातील एक ही आमदार; खासदार आपल्या नियोजित कार्यक्रमामुळे छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल येथील कार्यक्रमाला येऊ शकले नाही. ही वस्तुस्थिती असली तरी महाराष्ट्रात सत्ता बदल घडवून आल्यानंतर असे प्रथमच घडले असल्याने राजकीय निरीक्षक व काही कार्यकर्त्यांना नवल वाटले आहे.
महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समितीने सुचविलेल्या विकास कामांबाबत फेरफार करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथील नऊ कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निधीला स्थगिती दिली आहे. आ रोहित पवार यांच्या मतदारसंघातील अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या व इतर विकास कामांबाबत १२कोटी रुपयांच्या निधीला ही स्थगिती दिली आहे.असे आ. रोहित पवार यांनी सातारा शहरातील वादग्रस्त ऑफिसर क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, हाच धागा पकडून सातारा जिल्ह्यात विकास कामांच्या निधीला राज्य सरकारने ही स्थगिती देण्यात आल्याने पालकमंत्री व भाजप आमदार वगळता राष्ट्रवादी व काँग्रेस आमदार नाराज झाल्याची चर्चा होताना दिसत आहे. याबाबत संबधित पालकमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची आवश्यक प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे दुसरी बाजू मांडता आली नाही.