ठाणे : आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकारची निर्मिती केल्यानंतर ठाणेकरांना देखील पाणी, वीज व दर्जेदार शिक्षण मोफत देण्यात असल्याची घोषणा करताना भ्रष्टाचार मुक्त ठाणेची घोषणा दिली आहे. आमच्या या संकल्पनेला ठाणेकर चांगला प्रतिसाद देतील अशी आशा आम आदमी पक्षाचे संयोजक विजय पंजवानी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आम आदमी पक्षाच्या या घोषणेमुळे भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रीय काँग्रेस, मनसे या पक्षांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाने दिल्ली व पंजाब या दोन ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर महाराष्ट्रात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.
रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आम आदमी पक्ष सध्या तयारी करत आहे. यातच पक्षाच्या विस्तारास गती मिळावी यासाठी नूतन समितीचे गठन करण्यात आली असल्याचे देखील पंजवानी यांनी सांगितले . येत्या निवडणुकीत ज्यांना परिवर्तन करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वाना आपच्या वाटेने उमेदवारी देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
आम आदमी पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा संयोजक विजय पंजवानी, ठाणे शहराध्यक्ष राकेश आंबेकर, उपाध्यक्ष संदेश विचारे, सचिव मधुकर फर्डे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.