अजित जगताप
सातारा : महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या विविध प्रश्नांबाबत राज्य शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आलेला असून त्यानुसार दि २४ नोव्हेंबर २०२२रोजी पत्र पाठवण्यात आले आहे. तरी या प्रश्नाकडे गांभीर्याने बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पाहत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यकांनी महाराष्ट्रभर सार्वजनिक बांधकाम कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष व संघटनेचे उपसचिव व्ही. एल. जगताप यांनी दिली आहे.
नियुक्ती पासून वेतन निश्चित करणे, कालबद्ध पदोन्नती अंतर्गत वित्त विभागाच्या आदेशानुसार वेतनश्रेणीचा लाभ देणे, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. अलिबाग येथे झालेल्या बैठकीत संघटनेच्या कृती समितीचे सचिव शिवाजी जगताप यांच्या विनंतीनुसार आ. जयंत पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम भवन या ठिकाणी सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समितीचे सदस्य व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तसेच जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी निधन पावलेले आहेत.
त्यांच्या विधवा पत्नी व कुटुंब ही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कर्मचाऱ्यांनी आपला सेवेच्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत अनेक विकास कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
आता त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याने हे राज्य सरकारने आदेश दिले आहेत. परंतु, बांधकाम विभागाचे काही अधिकारी भांडवलदारांचे सेवक असल्यासारखे वागत आहेत. मुळातच आमच्या मागण्या या रस्ता असून या मागण्या पूर्ण करण्याची सक्षम क्षमता राज्य सरकारकडे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील परिमंडळातील अधिक्षक अभियंता याकडे दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे अर्धनग्न आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न मार्गी लावला असला तरी देखील बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. वाढत्या महागाईमुळे सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन त्यांना संघटनेचे नेते व्ही. एल. जगताप, जे. एस. कदम,ठेबरे, एम. ए. जगदाळे यांनी निवेदन दिले असल्याचे जगताप यांनी बोलताना सांगितले.