दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बोरी गावातील प्रमुख असंख्य कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. सदरचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम बोरी येथे शुक्रवारी (ता.२४) सायंकाळी ५ वा. भाजप नेते हर्षवर्धन पाटील व माजी मंत्री प्रा. राम शिंदे आणि मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या भाजप पक्षप्रवेशाकडे इंदापूर तालुक्यातील मोठी राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
ज्येष्ठ नेते कर्मयोगी शंकररावजी पाटील यांना राजकारणात साथ देणारे बोरी गाव आहे. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रीपदावर असताना शेततळी उभारणीसाठी व इतर विकास कामांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बोरी व परिसराच्या विकासासाठी वेळोवेळी सहकार्य केले आहे.
आताही राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असल्याने गावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही, बोरी गाव विकास कामात अग्रभाग राहील, अशी माहिती भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी दिली.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे बोरी गावात दोन महिन्यापूर्वी आले होते, त्याचवेळी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार याचे संकेत मिळाले होते.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यासह भाजपचे अनेक नेते, तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील राजकारणावर दुरगामी परिणाम करणाऱ्या भाजप पक्षप्रवेशाच्या या जंगी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन वसुंधरा सोशल फाउंडेशन, जय मल्हार भैरवनाथ परिवर्तन पॅनल व भाजप बोरी यांनी केले आहे.