कोल्हापूर : शेतकऱ्यांची ४० कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर कागल (जि. कोल्हापूर) तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आ. मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. तेव्हा कागलच्या काही शेतकऱयांनी मुश्रीफांनी आर्थिक फसवणूक केल्याची, तक्रार सोमय्यांकडे केली होती. त्यानंतर मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा पहिला आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर कागलच्या सर सेनापती साखर कारखान्यातही घोटाळ्याचा आरोप करत सोमय्यांनी ईडीकडे कागदपत्रे दिली होती. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचा तिसरा आरोपही सोमय्यांनी केला होता. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या घरी ईडीचे अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती.
गुन्हा सूड बुद्धीने ; मुश्रीफ समर्थक आक्रमक…
हा गुन्हा सुडबुद्धीतून दाखल केल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांनी केला आहे. तसेच या षडयंत्रामुळे कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी राहिल असा इशाराही मुश्रीफ यांच्या समर्थकांनी दिला आहे
या आधीही माझी चौकशी झाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे. मात्र, आता पुन्हा त्यांनी ही छापेमारी का केली हे मला काहीही माहिती नाही. ३० ते ३५ वर्षांचे माझे सार्वजनिक जीवन लोकांच्या समोर आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी कारवाई केल्यानंतर काहीही सापडलेले नाही. एखाद्याला नाउमेद करण्याचे हे काम सुरु आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा कारवाया होणार असतील तर याचा निषेध केला पाहिजे. तसेच हे केवळ त्रास देण्यासाठी सगळे सुरु आहे, असे मुश्रीफ यांचे छापेमारीनंतर म्हणणे आहे